संदीप खांडगेपाटील – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : सारसोळे गाव हे महापालिका मुख्यालयापासून ते मंत्रालयापर्यत सुपरिचित असे गाव. गावसुधारणेसाठी धडपडणार्या मनोज मेहेर या युवकाने प्रशासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि गतसहा वर्षात जनता दरबारात गावासाठी सातत्याने जनता दरबारात चपला झिजविल्यामुळे हे गाव नवी मुंबई कार्यक्षेत्रात प्रशासनदरबारी प्रकाशझोतात आले आहे. सारसोळे गावातील समस्यांबाबत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शनिवार, दि. ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता सारसोळे ग्रामस्थांना भेटीची वेळ दिली असून या भेटीत सारसोळेचे ग्रामस्थ महापालिका आयुक्तांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचणार आहेत.
या भेटीमध्ये सारसोळे गावातील ग्रामस्थांसोबत सारसोळे गावचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणार्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील व प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर उपस्थित राहणार आहे. मनपाच्या पाचव्या सभागृहात पहिल्याच महाभेत प्रभाग ८६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी बामणदेवाच्या मार्गाची डागडूजी आणि सारसोळे जेटीची दुर्रावस्था यावर लेखी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयास केला आहे. दुर्देवाने महासभा स्थगित झाल्याने सारसोळेच्या या समस्यांना प्रशासनदरबारी चालना मिळाली नाही.
गतमहिन्यात सारसोळेच्या जेटीची दुर्रावस्था, सारसोळेच्या जेटीवर ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्या, बामणदेव मार्गाचा प्रश्न आदींबाबत सिडकोचे माजी संचालक आणि नेरूळ प्रभाग ९३चे शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे बुधवार, दि. १ जुलै रोजी सारसोळेच्या जेटीची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेतला होता. विधानपरिषद सदस्या असताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सारसोळेच्या जेटीकरता १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दोन दिवसापूर्वीच्या पाहणी अभियानात सारसोळे गावच्या ग्रामस्थांना जेटीची दुर्रावस्था सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
ऐरोलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार व महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणार्या संदीप नाईकांनी यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनात सारसोळेच्या समस्यांबाबत विचारणा करत सारसोळे गावाला मंत्रालयीन पातळीवर प्रकाशझोतात आणण्याचे काम केले आहे. सारसोळे गावाची जेटीबाबत आमदार संदीप नाईकांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत त्याबाबत अडचणींविषयी विचारणा केली होती.
गेली ७ वर्षे मनोज मेहेर या सारसोळेच्या युवकाने महापालिका ते मंत्रालय, नेरूळ विभाग कार्यालय ते तत्कालीन पालकमंत्र्यांचा जनता दरबार आदी ठिकाणी सारसोळेच्या समस्यांचा पाठपुरावा केल्याने सारसोळे गाव एव्हाना प्रशासनदरबारी सर्वाच्याच परिचयाचे झाले आहे.
महापालिका आयुक्तांच्या भेटीअभियानादरम्यान बामनदेवाचा मार्ग, सारसोळे जेटीची दुर्रावस्था, गटारांचे प्रश्न, वेशीची समस्या, रस्त्यांची दुर्रावस्था, मल:निस्सारण वाहिन्यांची समस्या, हायमस्टची गरज, रस्त्यावर पडलेल्या विद्युत वायरच्या केबलचे जाळे, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यासह अन्य समस्यांचा सारसोळेच्या ग्रामस्थांकडून उहापोह केला जाणार असल्याची माहिती सारसोळेचे युवा ग्रामस्थ आणि कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.