कल्याण : गणेश पोखरकर
वाहतूक कोंडीच्या साडेसातीतून कल्याणकरांची लवकरच सुटका करून शहरातील वाढत्या अपघातांना रोखले जाईल असे ठोस आश्वासन भाजपा प्रदेश सचिव तथा कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणार्या अपघातावर कायम स्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने केडीएमसी आयुक्त दालनात शनिवारी सायंकाळी ४ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी येत्या सहा महिन्यात शहरातील वाहतुकीचे चित्र वेगळे असेल असे स्पष्ट केले. या विशेष बैठकीला केडीएमसी आयुक्त मधुकर अर्दड, कल्याण परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त संजय जाधव, वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेविका डॉ शुभा पाध्ये, नगरसेविका मनिषा धात्रक आणि महापालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
गेल्या तीन दिवसात कल्याण शहरात झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या वाढलेल्या अपघातांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार नरेंद्र पवार यांनी महापालिका आणि पोलीस यंत्रणेला आदेशित करून विशेष बैठकीचे आयोजन केडीएमसी आयुक्त मधुकर अर्दड यांच्या दालनात केले होते. यावेळी शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यांवर दुतर्फा बसणारे फेरीवाले, फुटपाथ वरील अतिक्रमण, वाहतूक शिस्त, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही, शहरातील अवजड वाहनांची वाहतूक, वाहतूक पोलीस आणि वार्डनची कमतरता, केडीएमसी रस्त्यांची कामे, वाहतूक शिस्तीसाठी नागरीकांचा सहभाग, वाहतूक नियोजनासाठी आवश्यक बदल आणि रखडलेला गोविंदवाडी बायपास आदी विषयांवर आमदार पवार यांनी सविस्तर निवेदन करून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. या सूचनांची गांभीर्याने दाखल घेऊन शहरातील वाहतुक पुढील सहा महिन्यात सुरळीत असेल असे आश्वासन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आमदार पवार यांनी दिले. वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ठिकाणी शासनस्तरावरून आणि आमदार निधीतून मदत केली जाईल असे आमदार यांनी यावेळी स्पष्ट केले. वाहतुकीला आणि फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी वेळप्रसंगी ताठर भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आदेश आमदार पवार यांनी दिले. त्याचप्रमाणे शहरातील नागरीकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान शहरातील अवजड वाहने आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक गोविंदवाडी बायपासच्या माध्यमातून बाहेरून वळवण्यास मदत होईल. हा बायपास खुला करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शासनाची मदत घेण्यात येईल असे आमदार पवार यांनी सांगितले. सदरची तांत्रिकबाब तातडीने दूर करून बायपास सुरु करण्यात येईल असे स्पष्ट केले.