बर्लिन : फॉक्सवॅगन या जगप्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनीच्या जर्मनीतील प्रॉडक्शन प्लांटमध्ये रोबोनं एका कर्मचार्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवी चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या दृष्टीनं तपासही सुरू आहे.
परदेशातल्या अनेक बड्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये अवजड कामं रोबोंकडून करवून घेतली जातात. वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या फॉक्सवॅगन कंपनीतही कारजोडणीच्या कामासाठी रोबोंचा वापर होतो. तसा प्रॉग्रेम त्यांनी तयार करून घेतलाय. तो सेट केल्यावर, रोबो त्याला नेमून दिलेलं काम चोख करतो.
फॉक्सवॅगनच्या बोनाटाल इथल्या प्लांटमध्ये सोमवारी २२ वर्षीय कर्मचारी रोबो सेट करण्याचं काम करत होता. तेव्हा, अचानक रोबोनं त्याच्या छातीवर जोरदार प्रहार झाला आणि मेटल प्लेटमध्ये दाबलं. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनं प्लांटमधील कर्मचार्यांमध्ये घबराट पसरली आहे. हा प्रकार घडला, तेव्हा आणखी एक कर्मचारीही जवळच उपस्थित होता. परंतु सुदैवानं, रोबोनं त्याला अजिबात इजा केली नाही. त्यामुळे प्रॉग्रॅम सेट करतानाच काहीतरी चूक झाल्यानं रोबोनं कर्मचार्याला ठार मारलं असावं, असा अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून वकील खटला दाखल करण्याच्या विचारात आहेत. परंतु, आरोपी कुणाला ठरवायचं, हेच त्यांना कळत नाहीए.