नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना तुटपुंज्या वेतनात काम करावे लागत असल्याने वाढत्या महागाईच्या काळात महापालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर व नियमितपणे देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
एकेकाळी श्रीमंत महापालिका आणि स्वमालकीचे धरण असणारी महापालिका असा नावलौकीक असणार्या महापालिका प्रशासनाकडे आज विकासकामांकरीता निधी शिल्लक नाही, ही बाब एव्हाना नवी मुंबईकरांनाही माहिती झालेली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची संख्या कायम कामगारांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. कंत्राटी कामगारांच्या परिश्रामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात राज्यामध्ये प्रथम क्रमाकांचा दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे. आजही नागरी समस्या निवारणाचे आणि नवी मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कंत्राटी कामगारांच्याच माध्यमातून करण्यात येत आहे. रस्त्यावर सफाई करणारे सफाई कामगार, मूषक नियत्रंणचे कामगार, धुरीकरणाचे कामगार आणि जलकुंभावरील कामगार, आरोग्य खात्यातील कामगार सातत्याने माझ्याकडे त्यांच्या वेतनविलंबाबतची समस्या मांडत आहेत. एकतर त्यांना पगार जेमतेम दहा-बारा हजार रूपये. त्यात पीएफ कापला गेल्यावर हातात नऊ ते साडेनऊ हजार रूपये हातात वेतन पडणार. वाढत्या महागाईच्या काळात त्यांना त्यांचा संसार चालविताना, मुलांचे शिक्षण करताना त्यांना किती अडीअडचणीचा सामना करावा लागतो याची फक्त त्यांनाच कल्पना असणार असल्याची कैफीयतन शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून मांडली आहे.
कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देण्याचे आणि नागरी समस्या सोडविण्याचे काम केले जात असल्याने त्यांचे वेतन सर्वप्रथम होणे आवश्यक आहे. आपण महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागातून कंत्राटी कामगारांच्या वेतनविलंबाबाबत खातरजमा करून घ्यावी. एकतर वेतन तुटपुंजे आणि त्यात वेतनात अनियमितपणा यामुळे कंत्राटी कामगारांच्या मानसिकतेवर आणि कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांचे विपरीत परिणाम नवी मुंबईकरांनाही भोगावे लागण्याची दाट शक्यता आहे. समस्येचे गांभीर्य व कंत्राटी कामगारांसह त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह आदी बाबींचा सांगोपांग विचार करून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणार्या कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर करण्याची मागणी मी आपणाकडे या निवेदनातून करत आहे. आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर होतील याबाबत आपण विशेष लक्ष घालावे अशी लेखी मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.