सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नागरिकांकडून विविध करांच्या रुपात जमा होणार्या महसुलातूनच नागरी सुविधांची कामे केली जातात. त्यामुळे नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासात मोठ्या प्रमाणावर कर भरणार्या व्यापारी, उद्योजकांचाही सिंहाचा वाटा आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी स्थानिक संस्था कराबाबत राबविण्यात येणार्या अभय योजनेचा लाभ घेऊन व्यापारी, उद्योजकांनी नवी मुंबईच्या विकासाला गती द्यावी व आपलाही लाभ करुन घ्यावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) विभागाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकरीता आयोजित एल.बी.टी. बाबतच्या अभय योजना २०१५ कार्यशाळेप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपकर / एल.बी.टी. विभागाचे उप आयुक्त उमेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आपल्या मनोगतात सन २०१३ मध्ये एल.बी.टी. लागू होण्याआधी नवी मुंबई महानगरपालिकेत उपकर प्रणाली यशस्वीरित्या राबविली जात होती. या दोन्ही प्रणालींच्या कार्यपध्दतीत साम्य असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी वर्गास इतर महानगरपालिकांच्या तुलनेत एल.बी.टी. प्रणाली सुविधाजनक वाटली. राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत एल.बी.टी. करीता अभय योजना लागू केलेली आहे. यामध्ये कर भरला तर व्याज व दंड किंवा शास्ती १००% माफ अशी सुविधा आहे. नोंदणीकृत व्यापारी, अनोंदणीकृत व्यापारी व तात्पुरते व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कर निर्धारण झालेले व न झालेले दोन्ही प्रकारचे व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एखादा व्यापारी न्यायालयीन प्रक्रियेत असेल व त्याने आपला दावा मागे घेतल्यास त्यासही या योजनेचा लाभ होऊ शकतो. एल.बी.टी. भरणा करण्यात व्यापार्यांचा आजपर्यंत उत्तम सहयोग मिळालेला आहे, तो या योजनेसही मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर कर निर्धारण करणे बाकी आहे अशा व्यापार्यांनीही कर निर्धारण करुन एल.बी.टी. भरल्यास त्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असे सांगत अभय योजनेचा लाभ घेण्यात व्यापार्यांचा आर्थिक फायदा असून यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस महसूल प्राप्त झाल्याने नागरी सुविधा कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होऊन नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल अशी भूमिका महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मांडली.
उपमहापौर अविनाश लाड यांनीही अभय योजनेचा लाभ व्यापारी, उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन केले. उपकर/एल.बी.टी. विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ यांनी चित्रमय सादरीकरणाद्वारे अभय योजनेची माहिती दिली.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते. त्यांनी अभय योजनेबाबत विविध प्रश्न विचारून शंका समाधान करुन घेतले. या कार्यशाळेमुळे परस्पर संवादी वातावरण निर्माण होण्यात मदत झाल्याचे मत अनेक व्यापारी, उद्योजकांनी व्यक्त केले व अभय योजनेचा लाभ घेण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला.
***************************
अभय योजनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कार्यशाळेला व्यापारी, उद्योजकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असे सांगत ३१ जुलै पर्यंत एल.बी.टी. अभय योजनेची मुदत असल्याचे स्पष्ट करुन या योजनेचा लाभ अनेक व्यापारी, उद्योजक घेतील असा विश्वास व्यक्त केला. ३१ जुलै पर्यंत एल.बी.टी. कर भरणार्या व्यापार्यांना व्याज व दंडाची रक्कम माफ होईल असे सांगत ३१ जुलै नंतर मात्र व्यापार्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
थकीत करनिर्धारण प्रकरणांवर यापुढील काळात विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. अभय योजनेतील सवलतींमुळे साधारणत: २० कोटींच्या दरम्यान महसूलातील नुकसान महानगरपालिकेला सोसावे लागले तरी मोठ्या प्रमाणावर अनोंदणीकृत डिलर्सची नोंदणी झाल्याने महानगरपालिकेचा प्रत्यक्षात फायदाच होईल अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
थकीत रक्कमेमध्ये मुख्य थकबाकी उपकराची (सेस) असल्याचे सांगत कार्यशाळेत व्यापार्यांनी विनंती केल्यानुसार महानगरपालिकेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत उपकराच्या थकीत रकमेबाबत काही तोडगा काढता येऊ शकेल काय? याविषयी महापौरांसह महापालिका पदाधिकार्यांशी चर्चा करुन सर्वसमावेशक विचार करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. ३१ जुलै नंतर उपकर व एल.बी.टी. वसुलीबाबत ठोस मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेमध्ये व्यापारी, उद्योजकांनी अभय योजनेबाबत सहकार्य करण्याची भूमिका दर्शविली असल्याचे स्पष्ट करीत याचा लाभ महानगरपालिकेच्या महसुली जमेला होईल व यातून अधिक उत्तम नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास पत्रकार परिषदेप्रसंगी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला.