* पर्यावरण शिक्षण विषयातील पेपर फेर तपासणीचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आदेश
गणेश पोखरकर
कल्याण : कल्याण शहरातील बिर्ला महाविद्यालयातील १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या पर्यावरण शिक्षण विषयातील पेपर फेर तपासणीचे आदेश देऊन राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी मुंबईत दिले. बिर्ला महाविद्यालयातील शिक्षकांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण विषयात ५० पैकी कमी गुण दिल्यामुळे सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घसरण झाली होती. मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या आदेशामुळे गुणांच्या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याबाबात राज्याच्या शिक्षण विभागाकडे सातत्य पूर्ण पाठपुरावा करणार्या भाजपचे प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांचे विद्यार्थी व पालकांनी आभार मानले.
बिर्ला महाविद्यालयातील १२ वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सुमारे ६०० विद्यार्थांना महाविद्यालयातील शिक्षकांनी पर्यावरण शिक्षण विषयात ५० पैकी कमी गुण दिले होते. अंतिम निकाल पत्र हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सदरची बाब लक्षात आली. याबाबत चिंताग्रस्त विद्यार्थी आणि पालकांनी सदर प्रश्नांबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्याकडे धाव घेतली. यानंतर नगरसेवक देवळेकर यांनी ही बाब आमदार नरेंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. याच दरम्यान कल्याण पश्चिम विभागातील वाणी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे कल्याण शहरात उपस्थित होते. यावेळी सदरची बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अडचण आमदार पवार यांनी शिक्षण मंत्री तावडे यांच्या पुढे मांडली. यावेळी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देऊ असे ठोस आश्वासन तावडे यांनी दिले.
दरम्यान यानंतर आमदार पवार यांनी तावडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. यामध्ये त्यांना शिवसेना शाखा प्रमुख अरुण बागवे, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर आणि शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजन देवळेकर यांचे मौलिक सहकार्य लाभले. आमदार पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षण मंत्री तावडे यांनी राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाला पर्यावरण शिक्षण विषयाचे पेपर फेर तपासणीचे आदेश दिले आहेत. पेपर फेर तपासणी केल्याने निश्चित स्वरूपात विद्यार्थ्यार्ंंची गुणवत्ता यादीत नक्कीच स्थर उंचवेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.