सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई: नवनवीन औषधांच्या शोधामुळे म्हणा किंवा इतर जगण्याच्या साधनसूचीतील वाढीमुळे एकूणच मानवाचे आयुष्यमान वाढले आहे. तशातच भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमालीची वाढत असून त्यांच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. भारताची आर्थिक परिस्थिती व प्रचंड लोकसंख्या, तशातच नैसर्गिक आपत्ती आणि एकूणच सर्व पातळीवरील सरकारी नियोजन यांचा विचार केल्यास, ‘वृद्ध व त्यांच्या समस्या’ खूपच गंभीर झाल्या आहेत. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शारीरिक व इतर अशा अनेक समस्यांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. नवी मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान असलेल्या वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे जेष्ठ नागरीकांसाठी नुकतीच दोन आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भरवलेल्या शिबिरात १०० हून अधिक जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बोन मिनरल डेनसिटी व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. जेष्ठ अस्थिव्यंग तज्ञ डॉ शैलेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरवलेल्या या शिबिरात ५० हून अधिक जेष्ठ नागरिक ओस्टोयोपोरोसिस या हाडाच्या आजाराने त्रस्त होते. ४ जुलैला ऐरोली सेक्टर ५ येथील सिनियर सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे विरंगुळा केंद्रात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ११० जेष्ठ नागरीकांनी भाग घेतला होता. या शिबिरात मोफत बोन मिनरल डेनसिटी तपासणी, मधुमेह रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी केली गेली. नवी मुंबईत जेष्ठ नागरीकांसाठी स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटल येत्या काळात आरोग्य तपासणी शिबिरे भरवणार असून नवी मुंबईतील जेष्ठ नागरिक संघटना व निवासी सोसायटी यातील जेष्ठ नागरीकांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहनही वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.