सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी होणारी वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईक यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात बुधवारी, दि. 8 जुलै रोजी त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांची भेट घेवून त्यांना सविस्तर निवेदन दिले. या प्रश्नी त्या त्या विभागातील वाहतुक नियंत्रण शाखेच्या अधिकार्यांची लवकरच एक बैठक घेवून वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त साळवे यांनी आमदार नाईक यांना दिले.
ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी अशा सर्वच भागात ज्या ज्या ठिकाणी वाहतुककोंडीची ठिकाणे आहेत. त्याची आणि ही वाहतुककोंडी कशामुळे होते यांची माहिती देणारे सविस्तर निवेदन या बैठकीत आमदार नाईक यांनी उपायुक्त साळवे यांना दिले.
* उड्डाण पुलांखालील धोकादायक पार्कींग
उडडाण पुलाखाली वाहनांची होणारी पार्कींग धोकादायक असून ती तातडीने बंद करावी, अशी सुचना आमदार संदीप नाईक यांनी केली आहे. पुलाखाली राहणार्या असामाजिक तत्वांकडून अतिरेकी स्वरुपाचे कृत्य या ठिकाणी होवू शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. या संबंधात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असून विधानसभेच्या अधिवेशनातही आवाज उठविणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले. या पुलांखालील भुखंडांबाबत एक कठोर धोरण आखले जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
* पार्कींगसाठी भुखंड उपलब्ध करुन घ्यावेत
ट्रकसारखी अवजड वाहने कुठेही उभी केली जातात. त्यांच्या पार्कींगसाठी नियोजन करावे. विविध प्रकरणांत जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्याबाहेर मोठया संख्येने ठेवली जातात. अशी वाहने उभी करण्यासाठी सिडको, एमआयडीसी या महामंडळांकडून पोलीसांनी भुखंड मागून घेण्याची सुचना आमदार नाईक यांनी केली.
* अनधिकृत गॅरेजेसच्या गाड्यांंवर कारवाई
शहरातील अनधिकृत गॅरेजेसचे चालक त्यांच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या करतात ज्यामुळे वाहतुककोंडीची समस्या उदभवत असते. अशा विनापरवाना गॅरेजेसवाल्यांवर कडक कारवाईची करण्याची मागणी आमदार नाईक यांनी उपायुक्त साळवे यांच्याकडे केली.
* सम विषम पार्कींग
ऐरोली, कोपरखैरणे, डी मार्ट आदी ठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या जटील आहे. या भागात सर्व्हेक्षण करुन सम विषम पार्कीगची व्यवस्था निर्माण करावी जेेणेकरुन या समस्येवर तोडगा निघेल, अशी सुचना आमदार नाईक यांनी केली.
* जनजागृतीपर कार्यक्रम
वाहतुक समस्येवर तोडगा काढण्यासाठी जनतेचा सहभागही तेवढाचा महत्वाचा आहे. वाहतुकविषयक नियमांचे पालन करण्याविषयी वाहनचालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी उपक्रम हाती घेण्याची सुचना देखील आमदार नाईक यांनी बैठकीत केली.
* लवकरच निघणार तोडगा
आमदार संदीप नाईक यांनी शहरातील वाहतुक कोंडीचे गांभिर्य उपायुक्त अरविंद साळवे यांच्या लक्षात आणून दिल्यावर या प्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल. आमदार नाईक यांनी विभागवार वाहतुकीच्या सांगितलेल्या समस्या स्थानिक वाहतुक नियंत्रण शाखेच्या अधिकार्यांसोबत एक बैठक आयोजित करुन सोडविण्यात येतील, असे आश्वासन उपायुक्त अरविंद साळवे यांनी दिले.