सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४६, ४८, ४८ अ परिसरातील सिडकोच्या सोसायट्यांमध्ये कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर प्रस्तावित एफएसआयसहीत या ईमारतींची डागडूजी करण्यात यावी अन्यथा आगामी काळात सिडकोच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा ईशारा शिवसेना शाखा ८७चे शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
नेरूळ सेक्टर ४६, ४८, ४८ अ परिसरात सिडकोच्या माध्यमातून ३२ गृहनिर्माण सोसायट्यार्ंतगत जवळपास ४२०० घरांचे बांधकाम करून सन ९७,९८ व ९९ मध्ये सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिला. ताबा दिल्यापासून घरामध्ये पाण्याची गळती होणे, स्लॅब कोसळणे अशा घटना वारंवार घडतच गेल्या. याबाबत संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांनी सिडको प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे येथील रहीवाशांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी सिडको संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सिडको विरोधात विविध स्वरूपाचे आंदोलन व मोर्चे काढून सिडको प्रशासनावर दबाव निर्माण केल्यानंतर येथील काही ईमारतींचे सिडकोकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल त्वरीत प्रसिध्द करण्यात येईल व त्यानंतर येथील घरांचे पुर्नबांधणी करण्याचे आश्वासन सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी दिले होते. मात्र केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल येथील सदनिकाधारकांना न देता तो दडपून टाकण्यात आला व सिडकोने दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याची नाराजी कडवट शब्दात शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन परिस्थितीत सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी येथील ईमारतींचा पाहणी दौरा केला असता तेही स्वत: थक्क झाले व येथील ईमारतींचे बांधकाम अंत्यत निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे त्यांनी मान्य केले. खरोखरच येथील रहीवाशी जीव मुठीत घेवून अतिशय धोकादायक परिस्थितीत राहत असून लवकरच येथील निकृष्ठ ईमारतींची पुर्नवांधणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून रहीवाशांना देण्यात आले. मात्र कार्यवाही आजतागायत झाले नसल्याचे शाखाप्रमुख विचारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
काही राजकीय पुढार्यांनी गेल्या पाच वर्षापासून नवीन एफएसआयचा निर्णय आठ दिवसात घेतला जाईल. मात्र याबाबतचा कोणताही ठोस व भरीव निर्णय झाल्याचे पहावयास मिळत नाही. अशा आश्वासनांना जनता कंटाळली असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. येथील दोन घरांचे स्लॅप कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. महापालिका प्रशासनाने सध्या घोषित केलेल्या धोकादायक ईमारतींच्या यादीत या परिसरातील ३ सोसायट्यांचा समावेश आहे. सिडको प्रशासन या ठिकाणी महाभयावह दुर्घटना होण्याची प्रतिक्षा करत आहे काय? नेरूळ सेक्टर ४६, ४८, ४८ अ परिसरातील सिडकोच्या सोसायट्यांमध्ये कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर प्रस्तावित एफएसआयसहीत या ईमारतींची डागडूजी करण्यात यावी अन्यथा आगामी काळात सिडकोच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा ईशारा निवेदनातून शाखाप्रमुख विचारे यांनी दिला आहे.