पनवेल : पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांबाबत पनवेल नगरपालिकेने दिर्घ काळासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरूवातीला मुख्य पाच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याकरीता एमएमआरडीए निधी पुरवणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्या असून गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पनवेल शहराच्या महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या परिसरात येणाऱे विविध प्रकल्प त्याचबरोबर वाढते नागरीकरण यामुळे शहराच्या झपाटयाने कायापलट झाला आहे. या व्यतिरिक्त तालुक्याचे ठिकाण आणि सर्व शासकिय कार्यालय शहरात असल्याने दररोज या ठिकाणी मोठी वर्दळ असते. एकंदरीतच पनवेल शहरातील रहदारी वाढत चालली असून त्यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरिकरणाचा विचार करता या ठिकाणी पायाभुत सुविधांचा विकास करण्याचे काम सुरू झाले आहे. 2006 नंतर शहरातील भुयारी गटार योजनेला अधिक चालना मिळाली त्याचबरोबर इतर पायाभुत सुविधांवरही भर देण्यात आला आहे . 2009 पासून त्यांनी शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरकडे अधिक लक्ष्य पुरविण्यात आले.आहे. पनवेल शहरातील रस्त्यांच्या समस्यांनी सातत्याने डोके वार काढले आहे. काही भाग सखल त्याचबरोबर समुद्र सपाटीपासून खाली असल्याने पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यांना खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर सतत वर्दळ असल्याने ते खराब होतात एकंदरीत खड्डे, डागडुजी व त्या संदर्भात ओरड ही पालिकेची डोकेदुखी ठरली आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून पनवेलचे रस्त्यांचे सिंमेटीकरण करण्याचा मुद्दा पुढे आला. एमएटीएनल रोडचे काँकिटीकरण केल्यानंतर आता इतर रस्तेही खड्डे त्याचबरोबर डांबरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरीता निधी मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या प्राधिकरणाने रस्त्यांच्या विकासाकरीता निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर निविदा सुध्दा प्रसिध्द करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. शिवाजी चौक ते पंचरत्न हाँटेल मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर ठाणा नाका रोडचे सिंमेटीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे.
पनवेल नगरपालिकेने खास रस्ते विकास प्रकल्प तयार केला आहे. याकरीता निधी प्राप्त व्हावा म्हणून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानार्तंगत प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. याकरीता 99.05 कोटींचा आराखडा पालिकेने तयार केला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तापसणीत हा आकडा 103.69वर पोहोचला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधका विभागाने 0.25 टक्के तांत्रिक मुल्यांकनांचे शुल्क भरण्याचे नगरपालिका संचालनालयाला कळवले आहे. इतकेच काय हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक अभिप्रायही नोंदवला आहे. त्यामध्ये नकाशा, लंबछेद, ड्रेनेज प्लान, युटिलिटी प्लान, रस्त्यांचे जंक्शन प्लॅन, पाईपलाईन यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करून माहिती तयार करण्यात आली आहे. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर इतर उर्वरीत रस्त्यांचे काम सुध्दा मार्गी लागणार आहे.
ठाणा नाका रोड, उरण रोड, उरण नाका ते टपाल नाका, कर्नाळा सर्कल- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा, कर्नाळा सर्कल -कर्मवीर भाऊराव पुतळा- शिवाजी चौक या रस्त्यांचे सिंमिटीकरण करण्यात येणार आहे. याकरीता 47 कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. त्यामध्ये नगरपालिका 10 टक्के म्हणजे 4.50 कोटी रूपये खर्च करणार असल्याचे प्रभारी शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
कर्नाळा सर्कल ते कर्मवीर पुतळा ते शिवाजी चौक हा रस्ता पाच कोटीच्या आतमध्ये असल्याने त्याची निविदा पनवेल नगरपालिकेने प्रसिध्द केली आहे. उर्वरीत रस्त्यांकरीता एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एजन्सी नियुक्त झाल्यानंतर कामाला सुरूवात होईल. रस्त्यांचा चांगला विकास व्हावा याकरीता प्रशासन कटीबध्द असल्याचे सूत्रांनी सांगितले.