संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा 15 जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाकरता नवी मुंबईसह ठाण्यातून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेसर यांनी शनिवारी नवी मुंबईत दिघा, तुर्भे स्टोअर, नेरूळ या ठिकाणी भेटी देवून मातब्बर कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत मोर्चाच्या रणनीतीबाबत चर्चा केली.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे, दलितांवरील अत्याचारास कठोर प्रतिबंध व जलदगती न्यायालयाची स्थापना करा, भूमिहीन शेतकर्यांना अतिक्रमित जमिनीचे मालकी पट्टे देण्यात यावेत, अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रिशीप व शिष्यवृत्ती मिळावी, अल्पसंख्यांक मुस्लिम विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात यावे, एस.आर.एमधील बिल्डरांची हुकूमशाही मोडीत काढा, विषारी दारूकांडातील आरोपींना फाशी द्या आणि संबंधित पोलिसांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा या प्रमुख मागण्यांकरीता 15 जुलै रोजी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची रणनीती रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेसर यांनी शनिवारी ठाणे व नवी मुंबईत आज प्रमुख व मातब्बर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करत मार्गदर्शन केले. सकाळी 10 वाजता ठाण्यात त्यांनी भेटीगाठी अभियानाला प्रारंभ केला, नेरूळ पश्चिमला सेक्टर 20 परिसरात सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या अभियानाचा समारोप झाला. ठाण्यात कल्याण, पालघर, भिवंडी भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. नवी मुंबईत दिघा, तुर्भे स्टोअर, नेरूळ या ठिकाणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भेटी देत कार्यकर्त्यांना दिवसभरात मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. कवाडे यांच्यासमवेत पक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन दांडगे उपस्थित होते. नवी मुंबईतून या मोर्चासाठी अधिकाधिक ताकद लागण्यासाठी आजच्या भेटीसाठी प्रा. कवाडेसरांनी केलेले मार्गदर्शन पोषक ठरणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन दांडगे यांनी दिली.