नवी मुंबई : महापालिका देत असणार्या आणि कंत्राटदारामार्फत कामगारांना प्राप्त होणार्या वेतनात साधर्म्य नसल्यामुळे, मुख्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन महापालिकेने थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याची मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी महासभेत केली आहे.
10 जुलै रोजी संपन्न झालेल्या नवी मुंबई मनपाच्या जून महिन्याच्या तहकूब महासभेत मुख्यालयात साफसफाईसाठी कार्यरत असणार्या कंत्राटी कामगारांचे वेतन महानगरपालिकेने थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी महापौरांच्या माध्यमातून आयुक्तांना केली आहे. महासभेतील ठराव क्रमांक 1 वरील चर्चेदरम्यान पाटील यांनी हा विषय मांडला. नवी मुंबई महानगरपालिका सबंधित कंत्राटदारास कार्यरत कामगारांचे वेतन अदा करते तदनंतर सदर कंत्राटदारातर्फे या कामगारांना वेतन धनादेशाद्वारे देण्यात येते. परंतु, पालिका अदा करणार्या आणि कंत्राटदारामार्फत कामगारांना प्राप्त होणार्या वेतनात समानता नसल्याचे वेळोवेळी आढळून येत असल्याचा आरोप सरोज पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे, नगरसेविका सरोज पाटील यांची मागणी ग्राह्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कामगारांना प्राप्त होणार्या वेतनात सुसूत्रता आढळून न आल्यास संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे आयुक्तांनी सभागृहात जाहीर केले.