हरेश साठे
पनवेल : रमजान अत्यंत पवित्र महिना म्हणून या काळात मुस्लिम बंधू१भगिनी उपवास पाळत असतात. भारतीय संस्कृती आपल्याला सर्वधर्माचे आदर करण्याची शिकवण देते. आपण सर्व तसेच वागतो आणि एकमेकांसह गुण्यागोविंदाने नांदत आहोत, असे मत भाजपाचे युवा नेते प्रल्हाद केणी यांनी व्यक्त केले. युवा नेते प्रल्हाद केणी आणि निर्दोष केणी यांच्यावतीने तळोजा फेस वनमध्ये रविवारी ‘इफ्तार पार्टी’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या इफ्तार पार्टीत युवा नेते ताहिर पटेल, प्रभाकर जोशी, मन्सूर पटेल, सिराज सय्यद, मुनाफ पटेल, माजिद पार्टनर, संतोष पाटील, दिलीप केणी, रईस पटेल, अश्रफ तांबे, जफर मुल्ला यांच्यासह सर्वधर्मिय बांधव सहभागी
झाले होते. सुरूवातीस धार्मिक पठण होऊन कार्यक्रमास सुरूवात झाली. एकमेकांना खजूर भरवून उपवास सोडून सर्वांनी यथेच्छ फराळाचा आनंद घेतला आणि सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
केणी पुढे म्हणाले की, संपूर्ण दिवस ईश्वरीय चिंतन आणि आत्मचिंतन तसेच अध्यात्मिक विचारांत घालवून सायंकाळी अजान नंतर कुटूंब, मित्रवर्ग, समाज यांच्यासह उपवास सोडले जाते. एकमेकांना सदिच्छा दिल्या जातात,
पुन्हा शांतीसाठी नमाज करतात, असे खूपच भक्तीपूर्ण आणि बंधूत्व वाढवणारे कार्यक्रम देशात बंधुभाव वृंध्दीगत करण्यास पोषक आहेत, असेही प्रल्हाद केणी यावेळी म्हणाले.