हरेश साठे
पनवेल : अत्यंत तातडीच्या क्षणी गरीब गरजू रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकंती करावी लागू नये, यासाठी रक्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून याकरिता रोटरी क्लब ऑफ पनवेलने कायम पुढाकार घेतला आहे.
रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल रोट्रॅक्ट क्लब तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ लक्ष्मी कॉलेज ऑप्टोमेट्री पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील मिडल क्लास को. ऑप.हौसिंग सोसायटी येथील गणेश मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १२० रक्तदात्यांनी रक्तादान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे उदघाटन रोटरीचे माजी प्रांतपाल व नामवंत वैद्यकीय तज्ञ गिरीष गुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ.सुहास हळदीपूरकर, रोटरी क्लब ऑफ पनवेलचे माजी प्रांतपाल व सदस्य डॉ.दीपक पुरोहित, अध्यक्ष अभिनय जोगी, सचिव संतोष आंबवणे आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
पनवेल शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या तसेच रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन गोरगरीब व गरजू लोकांना मोफत रक्त पुरविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल दरवर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत जमा होणारा रक्त पुरवठा रक्ताची गरज असलेल्या गरिब रूग्णाला मिळाले पाहिजे, यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून रक्तासाठी गरजूंनी रोटरीचे मेडिकल डायरेक्टर मिलिंद पर्वते भ्रमणध्वनी ९०२९६६१२३४ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरीच्यावतीने करण्यात आले आहे.