घनशाम कडू
उरण : विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण खात्यात खालपासून वरपर्यंत फक्त चर्चा सत्रे झडत असताना उरण तालुक्यातील सारडे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अनोख्या कल्पनेला मूर्त रूप देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तराच्या ओझ्यातून मुक्ति दिली आहे. ही अनोखी कल्पना प्रत्येक शाळेने राबवली तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तर खुपच हलके होऊन जाणार आहे .
सारडे हे उरण तालुक्यातील एक निसर्ग संपन्न गाव ! या गावात रायगड जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. शाळेची पटसंख्या फक्त ७०. मात्र विविध उपक्रमांमुळे ही शाळा नेहमी चर्चेत असते.
सद्या शासन दरबारी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी कसे करायचे यावर चर्चेचा किस काढला जात असताना या सारडे शाळेतील शिक्षक पुष्पलता ठाकुर (मुख्याध्यापिका) कौशिक ठाकुर,सुनिल नरे व उर्मिला म्हात्रे यांनी चर्चा करून एका अनोख्या संकल्पनेला मूर्त रूप देऊन विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी नव्हे तर विद्यार्थ्यांना दफ्तर मुक्तच केले आहे.यामुळे विद्यार्थी खुश व तणावमुक्त वाटत आहेत.
सद्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याना मोफत वह्या व पुस्तके देण्यात येतात.या पुस्तकांचा खुबीने वापर करून या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ही दफ्तर मुक्ती दिली आहे. शाळेच्या वार्षिक निकाला नंतर वरच्या वर्गात गेलेल्या मुलांकडून त्यांची जुनी पुस्तकेशाळेत जमा केली जातात व प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळा सुरू झाली की जुन्या व नव्या पुस्तकांचे असे दोन संच दिले जातात. त्यापैकी शाळेतील अभ्यासासाठी एक संच शाळेत व घरी अभ्यास करण्यासाठी दुसरा संच दिला जातो. तसेच सध्या घटक चाचणीनुसार अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांना एकच मोठी वही वापरण्यावर भर दिला आहे.पर्यायाने विद्यार्थ्यांना दफ्तरात पुस्तके व वह्यांचे ओझेच उरले नसल्याने सारडे शाळेतील विद्यार्थी दफ्तरमुक्त जीवन जगत आहेत.
या शाळेतील विद्यार्थी अभ्यासात व इतर उपक्रमात कमालीचे हुशार आहेत .शाळेत दररोज विविध विषयांवर चर्चासत्रे घेतली जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञानही उच्च दर्जाचे आहे.शाळेत फक्त एका वहीचे दफ्तर घेऊन येणारी सारडे शाळेची मुले इतर शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा तणावमुक्त दिसतात. सारडे शाळेची ही अनोखे रोल मॉडल असणारी संकल्पनेकडे उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अजुन पर्यत दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने ही संकल्पना प्रत्येक शाळेत राबवून विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कायमचे कमी करावे म्हणून उरणचे पत्रकार प्रविण पुरो, घनश्याम कडू, सुर्यकांत म्हात्रे, आनंद नारंगीकर, दिलीप कडू , विशाल गाडे हे लवकरच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार आहेत.