नवी दिल्ली : क्रिकेट जगतात खळबळ उडवणार्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने नेमलेल्या लोढा समितीने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन आणि शिल्पा शेट्टीचे पती आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा दोषी आढळल्याने त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय या समितीने दिला. सट्टेबाज प्रकऱणात मय्यपन आणि कुंद्रा याचा सहभाग होता असे समितीने यावेळी स्पष्ट केले.
या दोघांनाही कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटसंबंधित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. मय्यपन यांच्या बेटिंगप्रकरणामुळे बीसीसीआय, आयपीएल तसेच क्रिकेटची बदनामी झाल्याचे समितीने यावेळी सांगितले.
यासोबतच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावरही या समितीने बंदीची कारवाई केली आहे. या दोन्ही संघावर दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये बंदी घालण्याचा निर्णय या समितीने दिला आहे. आजपासून ही बंदी घालण्यात आली आहे.
याप्रकऱणी जानेवारी २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायलयाने माजी मुख्य न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती.