नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारच्या ’अच्छे दिन’च्या आश्वासनांची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला दिलेल्या शब्दांबाबत अत्यंत गंभीर आहेत. म्हणूनच, गेल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या आश्वासनांचा हिशेब पंतप्रधान येत्या स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना देणार आहेत.
येत्या १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून दुसर्यांदा देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. यावेळी जुन्या आश्वासनांचा आढावा घेण्याबरोबरच काही नव्या घोषणाही पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) या भाषणाची तयारी सुरू केली असून सरकारमधील सर्व खात्याना व नीती आयोगाला एक पत्रच पाठवलं आहे. जनतेल्या दिलेल्या आश्वासनांवर आणि जाहीर केलेल्या योजनांवर आतापर्यंत किती काम झालं, याचा अहवाल पीएमओनं मागवला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवून आणणारी कोणती पाच कामं तुमच्या खात्यानं केली याची माहिती २५० शब्दांत द्या. तुमच्या खात्याचे कोणते काम नेमके कोणत्या पातळीवर आहे, हे स्पष्ट करणारा एक तक्ताही पाठवा,’ असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
’पीएमओ’च्या या पत्रानंतर सरकारमधील विविध खात्यांची धावाधाव सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या मागील भाषणात ज्या खात्यांचा उल्लेख आला होता, त्या खात्याचे अधिकारी अहवाल तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. मोदींनी गेल्या वर्षी केलेल्या भाषणात अर्थ खात्याशी संबंधित जन-धन योजना, स्किल इंडिया मिशन (कौशल्य विकास मंत्रालय), मेक इन इंडिया (औद्योगिक धोरण व विकास खाते), डिजिटल इंडिया (माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार खाते), स्वच्छ भारत अभियान व सांसद आदर्श ग्राम योजना (ग्रामविकास) आदी घोषणा केल्या होत्या. यापैकी अनेक योजनांचे काम वेगात सुरू असल्याचे चित्र आहे.