हरेश साठे
पनवेल : पनवेल परिसरातील सिडको हद्दीतील इमारतींवर मेाबाईल टॉवर्स उभारण्यात येत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता.
पनवेल परिसरातील सिडको हद्दीतील इमारतींवर उभारण्यात आलेले मोबाईल टॉवर हटविण्याची मागणी अनेक सोसायटींच्या तक्रारीवरून स्थानिक लोकप्रतिनिधींनी सिडकोचे व्यवस्थापक यांच्याकडे एप्रिल २०१५ मध्ये निवेदनाद्वारे केली होती. मोबाईल टॉवर्समधून निघणार्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे मनुष्य, प्राणी तसेच नैसर्गिक संतुलनावर दुष्परिणाम होतो. हे विविध चाचण्यांमधून सिध्द झाले आहे. मानवी जीवनावर व नैसर्गिक संतुलनावर दुष्परिणाम करणारे मोबाईल टॉवर्स हटविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच यासंदर्भात शासन निश्चित धोरण ठरविणार आहे काय? असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात म्हंटले आहे की, खांदा कॉलनी, खारघर व वाशी इत्यादी सिडको हद्दीतील इमारतींवर उभारण्यात आलेले मोबाईल टॉवर हटविण्याच्या मागणीसंदर्भातील निवेदने प्राप्त झाली आहेत. मोबाईल टॉवर्समधून निर्माण होणार्या विद्युत चुंबकीय लहरी आयोनायजिंग नसल्याने मनुष्य, प्राणी तसेच नैसर्गिक संतुलनावर प्रमाणित होत असल्याचे सिध्द होत नाही. तथापि दुरसंचार सुविधांच्या जाळयासाठी उपकरणांची व बेस स्टेशनची उभारणी याबाबत दूरसंचार विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे दि.४मार्च २०१४ च्या अधिसूचनेनुसार धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार इलेक्ट्रोAमॅग्नेटिक फिल्ड, रॅडीएशन नॉर्म्स (ई.एम.एफ.) संदर्भात मोबाईल टॉवर उभारण्यापूर्वी दुरसंचार विभागाची पूर्व मान्यता घेणे बंधनकारक आहे.