नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविल्या जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने नागरिकांना होणारा त्रास त्वरीत दूर व्हावा या दृष्टीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांच्या तक्रारीबाबत अभियांत्रिकी विभागाने तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे.
नागरिकांना रस्त्यांविषयी असलेल्या तक्रारी महानगरपालिकेकडे सहजपणे पोहचविता याव्यात व त्यावर तत्पर कार्यवाही व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी दिली आहे. ही प्रणाली चार पध्दतीने कार्यान्वित राहणार असून रस्त्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्याकरीता नागरिकांसाठी आठही विभाग कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिक १८००२२२३०९ व १८००२२२३१० या दोन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून मोफत आपल्या रस्त्यांविषयीच्या तक्रारी नोंदवू शकतात.
नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या तक्रार निवारण संगणक प्रणालीमध्ये नागरिक सेवानिहाय तसेच सेवेतील बाबींबाबत तक्रार नोंदवू शकतात. अशाप्रकारे ऑनलाईन तक्रार नोंद केल्यानंतर तक्रारदारास संगणकीय तक्रार क्रमांक देण्यात येतो. या तक्रार क्रमांकानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती व सद्यस्थिती नागरिक ऑनलाईन पध्दतीने ट्रॅक ग्रिव्हेन्सव्दारे पाहू शकतात. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर नागरिकांना तक्रारीची सद्यस्थिती लगेच उपलब्ध होते.
यामध्ये नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सध्याचे मोबाईल वापरण्याचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता महानगरपालिकेमार्फत ८४२४९४९८८८ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत असून नागरिक या मोबाईल क्रमांकावर रस्त्याच्या तक्रारी एस.एम.एस. स्वरुपात पाठवू शकतात. तसेच व्हॉट्स पव्दारे फोटोही पाठवू शकतात. याबाबतच्या नियंत्रणात्मक कार्यवाहीकरीता महानगरपालिकेमार्फत अभियांत्रिकी विभागातील सक्षम अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दर्जेदार व प्रशस्त रस्ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आले असून खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महानगरपालिका कटीबध्द आहे. त्यामुळे रस्त्यांबाबतच्या तक्रारी निवारणासाठी महानगरपालिकेने सुरु केलेल्या चार प्रकारच्या तक्रार निवारण प्रणालीचा उपयोग करुन नागरिकांनी स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीत आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.