नवी दिल्ली : सट्टेबाजी प्रकरणी आजीवन बंदीची कारवाई झालेला राजस्थान रॉयल्स संघाचा सह संघमालक राज कुंद्राने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
आपल्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे नसताना आपल्यावर कारवाई करण्यात आली असे राज कुंद्राने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने राज कुंद्रा आणि गुरुनाथ मयप्पनला सट्टेबाजी प्रकरणात दोषी ठरवून क्रिकेटशी संबंधित कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आजीवन बंदी घातली आहे.
लोढा समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनाही आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. लोढा समितीचा निर्णय माझ्यासाठी दु:खद आहे. यामुळे माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मी तपासात जे सहकार्य केले तेच माझ्यावर उलटले असे मला वाटते. पहिल्या दिवसापासून मी मुदगल समितीला सहकार्य केले. माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसताना मला दोषी ठरवण्यात आले असे राज कुंद्राने म्हटले आहे.