पुणे : वन रँक-वन पेन्शन‘ योजना लागू करावी, या माजी सैनिकांच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मैदानात उतरणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी ते दिल्लीत उपोषण करणार आहेत.
‘वन रँक-वन पेन्शन‘ या माजी सैनिकांच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. याबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. संरक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या बैठकीत ‘वन रँक-वन पेन्शन‘ योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी अर्थ खात्याने पाच अब्ज रुपये देण्याची तयारीही दर्शविली असतानाही ही योजना लागू केली जात नाही, हे योग्य नाही, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यातही ही पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मग आता सरकार टाळाटाळ का करीत आहे, असे विचारून हजारे यांनी म्हटले आहे, की माजी सैनिक या नात्याने या मागणीला माझा पाठिंबा आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्यासही माझी तयारी आहे. संसदेच्या सदस्यांची पेन्शन दुप्पट करण्याची मागणी तत्काळ मंजूर होईल. मग माजी सैनिकांची रास्त मागणी सरकार मंजूर का करीत नाही?‘ भूसंपादन विधेयकाला जनतेचा विरोध असतानाही तो मंजुरीचा अट्टहास सरकार धरत आहे. जनलोकपाल‘वर राष्ट्रपतींची सही होऊनही तो लागू केला जात नाही, ही देशाची शोकांतिका आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. ‘वन रँक-वन पेन्शन‘ आणि भूसंपादन विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला आहे.