मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारीही मोठ्याप्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. शुक्रवारी विरोधक आणि सत्ताधार्यांच्या गोंधळानंतर विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षणाबाबत मुद्दा उपस्थित होताच त्यांना आक्रमक पवित्रा घेतला. माझ्या वडिलांकडे पृथ्वीराज चव्हाणांच्या वडीलांप्रमाणे पैसे असते तर मीही विदेशात शिक्षणासाठी गेलो असतो. आम्ही गरीब होतो, त्यामुळे परदेशात न जाता याठिकाणीच प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले, असे विनोद तावडे यावेळी म्हणाले.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला होता. घोटाळ्याचे आरोप झालेल्या मंत्र्यांन आधी राजीनामे द्यावे, तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याचे विरोधकांनी लावून धरले होते. अशा प्रकारे विरोधकांचा गोंधळ पाहून सत्ताधारी आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. अनेक आमदार हौद्यात येऊन घोषणाबाजी करत होते. त्यामध्ये विरोधकांसह सत्ताधारी आमदारांचाही समावेश होता. त्यामुळे वाढणारा गोंधळ पाहून अखेर विधानसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच विरोधकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसांत मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोपांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. राज्यातील दुष्काळ सदृश्य स्थिती, विकास कामे अशा लोकोपयोगी प्रश्नांकडे मात्र या राजकारण्यांचे दुर्लक्ष झालेले या अधिवेशनात आतापर्यंत पाहायला मिळत आहे.