* माजी खासदार संजीव नाईक यांचा मनोदय
नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे काल सोमवारी शिलॉग येथे एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉ.कलाम यांच्या जाण्याने भारत एका महान व्यक्तीमत्वाला मुकला आहे. शेवटच्या क्षणापर्यत देशाला एका विशाल उंचीवर नेण्याचा त्यांचा ध्यास हा आजच्या पिढीसाठी बाळकडू ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी दिली.
नाईक यांनी डॉ.कलाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून नवी मुंबई शहराचा महापौर ते ठाणे लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून मागील कारकीर्दीत डॉ.एपीजे कलाम यांच्याशी अनेकदा भेट झाली असल्याचे सांगितले. डॉ.कलाम यांची महत्वाची आठवण म्हणजे नवी मुंबई शहराचा महापौर असताना शहरासाठी भूषणावह ठरलेल्या नेरुळ येथील वंडरपार्क येथे विज्ञान सेंटर उभारण्याची संकल्पना डॉ.कलाम यांची होती आणि ती पुर्णत्वास आली याचा मला अभिमान असल्याची भावना नाईक यांनी व्यक्त केली. आपल्या कर्तुत्वाला राजकारणाचा तिळभरही गंध न लावता निष्ठेने देशसेवा करणारा सर्व सामान्यांचा मार्गदाता हरपल्याची भावना व्यक्त करत नेरुळ येथील वंडर पार्क मधील विज्ञान केंद्राला भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देऊन त्यांना नवी मुंबईकरांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्याचा मानस नाईक यांनी बोलताना व्यक्त केला.