मुंबई : भाजपाने खासदार बनवून सहा महिन्यांहून अधिक काळ झालेले रिपाइं नेते व खासदार रामदास आठवले यांना अजूनही घर न मिळाल्याने त्यांची दिल्लीत घरासाठी वणवण सुरू आहे. गेल्या सरकारच्या काळात खासदारकी गेल्यानंतरही घर न सोडल्याने शेवटी त्यांचे सामान घराबाहेर काढले होते, मात्र आता ज्या सरकारने राज्यसभेची खासदारकी दिली, ते सरकार आठवले यांना अजूनही घर द्यायला तयार नाही. त्यामुळे आपली दिल्लीत घरासाठी वणवण सुरू असल्याची खंत आठवले यांनी सोमवारी बोलून दाखवली.
लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी रिपाइं नेते रामदास आठवले यांना खासदार बनवले आणि त्यानंतर मंत्रीपदाचे गाजर दाखवले. यामुळे त्यांनी मंत्रीपदाची वाट पाहत मोठे घर दिल्लीत मिळेल या अपेक्षेवर दिवस काढले. मात्र मंत्रीपद नाही आणि घरही नाही अशी अवस्था आठवले यांची झाल्याने त्यांना दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये आपला मुक्काम करावा लागत आहे. राज्यसभेवर निवड झाल्यावर मी तुघलक रोडवरचा बंगला मागितला. तर तो तेलगू अभिनेते व खासदार चिरंजिवी यांना देण्यात आला. मुरली देवरा यांच्या निधनामुळे त्यांचा बंगला रिकामा झाला. तो मागितला, तोही नाकारण्यात आला.
रामगोपाल यादव यांचा बंगला खाली होता. तो मागितला, तो इतरांना देऊन टाकला. त्यानंतर मी सपाचे अमरसिंह यांच्या रिकाम्या बंगल्याची केलेली मागणीही नाकारल्याची माहितीही आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार म्हणून माझी आता तिसरी वेळ आहे. त्यामुळे मला कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे आठ टाईपचे घर मिळावे. मात्र केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ऐकत नाही, असे आठवले यांनी सांगितले.
मी घर न मिळाल्याची तक्रार नितीन गडकरी, व्यंकया नायडू या ज्येष्ठ मंत्र्यांकडे केली. त्यावेळी गडकरी यांनी चेअरमनला फोन करून हे माझ्याकडे छोट्या-छोट्या गोष्टीसाठी येतात, त्यांच्या घराचा प्रश्न सोडवा असे सांगितले. परंतु घर मिळालेले नाही, असे आठवले म्हणाले. मी शेवटी तीनमूर्ती लेनचा बंगला मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनाही घराची वणवण चालल्याचे पाहून धक्का बसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.