पटना – बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मी निवडणूक लढविणार नसून माझा पूर्ण वेळ प्रचारासाठी देणार आहे असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी बिहारमध्ये अनेक पक्षांनी एकत्र येत युती केली आहे. त्यासाठी संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह अन्य काही पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान कुमार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून युतीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र, भाजपला रोखण्यासाठी शेवटी त्याबाबत एकमत झाले.
भाजपला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांचा प्रचार करता यावा, राज्यभर फिरता यावे, तसेच प्रचार मोहिमेचा नेतृत्त्व करता यावे यासाठी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे कुमार यांनी जाहीर केले आहे.