धुळे: कांद्याचे भाव सध्या वधारल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात कांदा चोरीच्या घटनेने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.
कांदा चोरीचा तपास त्वरेने होण्यासाठी तुम्ही जोतिष्याकडे जा, कोणत्या दिशेला कांदा चोरी गेला आहे हे ज्योतिषी तुम्हाला बरोबर सांगेल असं कांदा चोरीच्या घटनेचा पंचनामा करणार्या पोलिसांनी संबंधित शेतकर्याला सांगितल्याने या शेतकर्याची पोलिसांनी एक प्रकारे थट्टाच केली आहे. विशेष म्हणजे कांदा चोरीची घटना होऊन 72 तास उलटून गेलेला असतानाही पंचनामा करणार्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.
धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथील सुनील पाटील ऊर्फ नेरकर यांच्या चाळीत भरून ठेवण्यात आलेला 80 हजाराचा उन्हाळी कांदा चोरीस गेला आहे. तशा आशयाची तक्रार संबंधित शेतकर्याने तालुका पोलीस स्टेशनला दिली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाच दाखल केला नसल्याचं पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी देखील संबंधित पोलीस अधिकार्यांची कानउघडणी करत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.