** एटीएम ऑपरेटरसह इतर तिघांना अटक
पिंपरी : कंपनीने दिलेल्या पासवर्डचा दुरुपयोग करून मौज मजेसाठी पिंपरी चिंचवडमधील विविध भागातील एटीएम मशीनमधून तब्बल ५१ लाख लांबणार्या ऑपरेटरसह इतर तिघांना अटक करण्यात आली. शनिवारी (दि.१) हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अशोक भीमाशंकर बबलेश्वर (वय ३९, रा. संतोषनगर, कात्रज), अमोल अशोक भांडवलकर (वय २७, रा. घुंगरुवाली चाळ, कात्रज), अजय जुगलकिशोर शर्मा (वय ३१, रा. कात्रज) निलेश अच्युतराव घिरडे (वय २८, रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. शंकर किसन भोसले (वय ३८, रा. नांदेडसिटी, सिंहगडरोड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर मधील लॉजीकॅश सोल्युशन या कंपनीमार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विजय बँक या बँकांच्या एटीएम केंद्रात पैसे भरण्याचे काम केले जाते. कंपनीच्या पिंपरी चिंचवड परिसरातील कामासाठी कंपनीतर्फे दोन एटीएम ऑपरेटर नेमण्यात आले होते. दीड महिन्यांपूर्वीपासून पिंपरी चिंचवडच्या सुरक्षा रक्षक नसलेल्या काही बँकेतून पैसे चोरीला जात असल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तपास करत असताना खंडणी विरोधी पथकाने कंपनीचा एटीएम ऑपरेटरअशोक बबलेश्वर याला पुणे स्टेशन परिसरातून अटक केली. पोलिसीखाक्या दाखवल्या असता त्याने औंध, सांगवी, डांगे चौक, वाकड, ज्योतीबानगर, रहाटणी, काळेवाडी, मासुळकर कॉलनी, पिंपरी, खडकी, चाफेकर चौक, चिंचवड व रावेत अशा विविध भागातील तब्बल १४ एटीएम केंद्रातून चोरी केल्याची कबुली दिली. त्याने कंपनीने दिलेल्या पासवर्डचा दुरुपयोग करत ५१ लाख रुपयांची रोकड लंपास केली तसेच हे पैसे त्याने साथीदारांसह मौज, मजा व चैनीसाठी खर्च केल्याचे सांगितले. याप्रकरणी बबलेश्वरला मदत करून तसेच गुन्ह्यात सहभागी झाल्याप्रकरणी त्याचा इतर तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली.
बबलेश्वरवर पिंपरी, वाकड, चिंचवड व खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल शेलार, सहायक फौजदार लोखंडे, पोलीस कर्मचारी राजू पवार,प्रमोद मगर, रमेश गरुड, नागनाथ गवळी, प्रशांत पवार, बबन बोर्हाडे, चंद्रकांत सावंत व पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
*****
कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस कठोर : ४१ जणांवर तडीपारीची कारवाई
सराईतांना मुसक्या
पुणे : शहरातील गुन्हेगाचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर शहरातील पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यातील शहरातील ४१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, अजूनही काही जणांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार तडीपार, मोका आणि एमपीडीसारख्या कारवाईचा धडाका लावला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील गुन्हेगाराचे प्रमाण वाढत आहे. त्यात संघटित गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगारांचा त्यामध्ये समावेश असल्याचे पोलीस तपासात अनेकदा निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या त्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांनी आपल्या हद्दीमधील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून प्रस्ताव तयार केला. त्यानुसार शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी यादीतील प्रथम ४१ जणांना तडीपार करण्यात आले असून, आणखी वीसहून अधिक जणांना तडीपार करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पोलीसांनी ४१ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असून, त्यापैकी ३१ जणांना दोन वर्षासाटी, सहा जणांना एका वर्षासाटी, तर पाच जणांवर सहा महिन्यांसाठी तडीपाराची कारवाई केली आहे. सर्वाधिक तडीपार पिंपरी पोलीस ठाण्यातील हद्दीतील असून, आणखी सराईतींची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे, सर्वाधिक कमी दोन तडीपार भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आली आहे. वाकड पोलिस ठाण्यातून एकही कारवाई करण्यात आली नाही.
* सराईत गुन्हेगार तरूण वयोगटातील
शहरातील तडीपार करण्यात आलेले सर्वजण अवघे वीस ते पंचवीस वयोगटातील असल्याचे आढळून आले. कमी वयामध्ये ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहे. परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी, तसेच गल्लीगुंडाचे सराईत गुन्हेगारामध्ये रुपातंर झाल्याने कमी वयामध्ये ते भाई’ होण्याचे स्वप्न बघू लागले आहेत.
** ‘एमपीडी’, मोक्काचा लगाम…
गेल्या महिन्यामध्ये गोट्या धावडे टोळीतील १६ सराईत गुन्हेगारांना संघटीत गुन्हेगारी कायदा (मोका) कारवाई करण्यात आली. त्यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली. इतर फरार आहेत. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी मोकाची कारवाई केली. त्याचप्रमाणे एमपीडी ऍक्टनुसार सुमारे २४ जणांना एक वर्षाच्या स्थानबंध करण्यात आले आहेम अशी माहिती उपायुक्त डॉ, बसावराज तेली यांनी दिली.
** मोटार चोरणारे दोघे परप्रांतिय गजाआड
पिंपरी पोलिसांची कारवाई; बनावट चाव्यांचा झुडगा हस्तगत
पिंपरी : बनावट चाव्यांनी सॅन्ट्रो मोटारी चोरणार्या दोघां परप्रांतियांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांकडून एक मोटार, बनावट चाव्यांचा झुडगा, पकड, कानस आणि स्कू ड्रायव्हर असे दोन लाख रुपयांचे साहित्य हस्तगत केले आहे. त्या दोघांपैकी एकजण सराईत असून, आणखी गुन्हे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
बशीर अहमद मुख्तार अहमद खान (वय ३५, रा. सुलाबाद, युपी) आणि शहाबुद्दीन नशीर अहमद शेख (वय ३२, रा. सिंगपुर, जि. बलरामपुर, युपी) या दोघांना अटक केली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सैफान मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील नव महाराष्ट्र महाविद्यालयजवळ गुरूवारी (दि. ६) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण एका सॅन्ट्रो मोटारीचा लॉक उघडण्याचा प्रयत्न करीत होते. त्या मोटारीचा आलर्म वाजला, त्यामुळे परिसरातील नागरिकांना याची माहिती पोलिसांना दिली. पिंपरी पोलिसांचे रात्र गस्तीचे सहायक निरीक्षक सुरेश मट्टामी आणि त्यांच्या पथकाला याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले. प्रथम दोघांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली; मात्र त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये बनावट चाव्यांचा झुडगा आढळून आला. त्यानुसार दोघांना पोलिस ठाण्यामध्ये चौकशीशाठी आणले. दोघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटार (एम एच ०४ ईटी ४३१२) आणि त्यांच्याजवळील हत्यारे ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कदम तपास करीत आहेत.