नवी मुंबई : धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी डॉ.कलाम यांना श्रद्धांजली वाहताना वाशी येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. मेहुल कालावाडीया म्हणाले, डॉ. कलाम यांचे देशासाठी कार्य महान असून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशासाठी काम केले त्यांचे हे योगदान दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक होते. महान व्यक्ती, शास्त्रज्ञ, शिक्षक, मार्गदर्शक, मिसाईल मॅन आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. कलाम यांच्या निधनामुळे देशाने एक कर्तृत्ववान मार्गदर्शक हरपला; त्यांचे भारताला महासत्ता बनविण्याचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी वोक्हार्ट हॉस्पिटलमधील नर्सेस, कर्मचारी व डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्मचार्यांतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या पुस्तकातील काही भागांचे समूह वाचन करण्यात आले. आपल्यासमोरील समस्या ओळखा आणि त्यातून मार्ग काढायला शिका,कधीही हार मानू नका, हा त्यांचा मंत्र आरोग्य क्षेत्रातील नवीन आव्हानांना सामोरे जाताना आम्हाला फार उपयुक्त ठरतो असे मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे जेष्ठ अस्थीव्यंगतज्ञ डॉ. शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.