नवी मुंबई शहर हे सिडकोनिर्मित सुनियोजित शहर असले तरी सध्या शहराची अवस्था पाहता हे शहर खरोखरीच सुनियोजित आहे का, याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. या महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात प्रथम क्रमाकांचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. पण हा ईतिहास झाला, वर्तमानात काय आहे? शहरात ठिकठिकाणी वाढत चाललेल्या अनधिकृत झोपड्या, नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली लागत असणारे मोठ्या प्रमाणावरील अनधिकृत होर्डिग यामुळे नवी मुंबई शहराच्या सौंदर्याला ग्रहण लागले असून हे गेल्या काही वर्षापासून बकालपणाच्या विळख्यात अडकले जावू लागले आहे. पण याचे दुर्दैवाने कोणालाही सोयरसुतक नाही.
अनधिकृत होर्डीग लावणार्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आहे. पण महापालिकेने हजारोंच्या संख्येने अनधिकृत होर्डिग लागत असतानाही एकावरही अनधिकृत होर्डीग लावले म्हणून फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. मग महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग करतो काय? हा विभागाचा अतिक्रमण घोटाळा आजही नवी मुंबईकर विसरलेले नाहीत. अनधिकृत होर्डीग काढण्यात कामचुकारपणा केला जातो, अनधिकृत होर्डीग लावणार्यांविरोधात महापालिका प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करत नाही, मग हा निष्क्रिय अतिक्रमण विभागाचा ‘पांढरा हत्ती’ नवी मुंबईकरांनी का म्हणून पोसायचा? सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांच्या श्रमातून कमविलेल्या पैशातून नवी मुंबई महापालिकेचे अर्थकारण सांभाळले. अतिक्रमण विभागाला नवी मुंबईच्या बकालपणाविषयी काही देणेघेणे नसेल तर हे खाते सांभाळायचे कशाला? या विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांचे चोचले नवी मुंबईकरांनी पुरवायचेच कशाला असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.
अनधिकृत होर्डिग लावणार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दोन वर्षापूर्वी देण्यात आले होते. कोणत्या कलमानुसार अनधिकृत होर्डीग लावणार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याची विस्तृत माहितीही महापालिका प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिध्दीकरता ‘मिडीया’लाही देण्यात आली होती. पण कुठे माशी शिंकली याचे उत्तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवी मुंबईकरांसमोर देणे गरजेचे आहे.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेबाबत व सौंदर्याविषयी सातत्याने सार्वजनिकरित्या तसेच खासगीतही बोलताना काळजी व्यक्त केली होती. शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत होर्डींगविरोधात त्यांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे. पण लोकनेेते गणेश नाईकांचेच दुर्दैवंच म्हणावे लागेल की त्यांच्याच नगरसेवकांकडून, कार्यकर्त्यांकडून, समर्थकांकडून, हितचिंतकांकडून आज नवी मुंबईच्या कानाकोपर्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डीग लावले जात आहेत. या अनधिकृत होर्डींगमुळे या शहराला मोठ्या प्रमाणावर बकालपणा येत आहे, शिवाय महापालिका प्रशासनाचे लाखो रूपयांचे उत्पन्नही बुडत आहे.
आज विकासकामे करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे निधी उपलब्ध नाही. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना विकासकामे करण्यासाठी निधीच नसल्याने ते मतदारांना नागरी समस्या विचारण्याचे धाडस दाखवित नाहीत. शहरामध्ये आपल्या प्रसिध्दीसाठी राजकीय क्षेत्रातील घटकांकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डीग सातत्याने लावण्यात येतात. याच अनधिकृत होर्डीग लावणार्यांमुळे बॅनर बनविण्याचे व्यवसायही फोफावू लागले आहेत. बॅनर बनविण्यासाठी या ‘चमकेश’ मंडळींकडे निधी आहे, पण महापालिका प्रशासनाकडे बॅनर लावण्यासाठी परवानगी काढण्याचे व बॅनर लावण्यासाठी या ‘चमकेश’ मंडळींकडे वेळ नाही व हे घटक याविषयी स्वारस्यही दाखवित नाहीत. कारण अनधिकृत होर्डीग लावताना त्यांना महापालिका प्रशासनाविषयी धाकही फारसा राहीलेला नाही. आज महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या उदासिनतेमुळे, नाकर्तेपणामुळे अनधिकृत होर्डीग लावणार्यांचे धाडस वाढीला लागले आहे.
हे कोठेतरी थांबले पाहिजे. आपल्या शहराचा बकालपणा घालविण्यासाठी आणि आपल्या शहराचे सौंदर्य जतन करण्यासाठी आपणच आता पुढाकार घेतला पाहिजे. केवळ चिंता व्यक्त करून आता चालणार नाही, आता खर्या अर्थांने कृतीची गरज आहे. आपल्या शहराच्या सौंदर्यासाठी आता आपणच जागृकता दाखविली पाहिजे. अनधिकृत होर्डींग लावणार्यांना आता चाप लावण्यासाठी कोठेतरी जनजागृतीची गरज आहे. नवी मुंबईकरांनीच थंडपणा दाखविल्याने नवी मुंबई शहराला बकालपणा आला आहे. आपल्या उदासिनतेमुळेच शहराच्या सौंदर्याला ग्रहण लागले आहे. विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. आपले शहराचे सौदर्य वाचविण्यासाठी या शहराला लागलेला बकालपणाचा काळीमा नष्ट करण्यासाठी एकत्रित येवू या ऽऽ आम्ही नवी मुंबईकर या शब्दाची व्याख्या आता कृतीतून स्पष्ट करू याऽऽऽ