मुंबई : हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेली स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू ‘राधे मॉं’ हिच्या ’लीला’ अधिकच अगाध होत चालल्या आहेत. औरंगाबादहून मुंबईकडे येणार्या जेट एअरवेजच्या विमानात ‘राधे मॉं’ त्रिशूळ घेऊन चढल्यानं आता नवा वाद उद्भवला आहे. विमानातील इतर प्रवाशांनी यास जोरदार आक्षेप घेतला असला तरी सुरक्षा अधिकार्यांनी मात्र ‘राधे मॉं’नं कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव विमान प्रवासात कात्री, सुरे, काटे किंवा धार असलेल्या कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. अशा वस्तू आढळल्यास प्रवाशांना विमानात परवानगी दिली जात नाही किंवा त्या वस्तू जप्त केल्या जातात. मात्र, रविवारी औरंगाबादहून मुंबईकडे येणार्या ‘राधे मॉं’ हिला त्रिशूळ घेऊन विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली. अन्य प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी नोंदवली. त्यावर विमानतळाची सुरक्षा पाहणार्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकार्यांनी ‘राधे मॉं’ची पाठराखणच केली. ‘राधे मॉं’ला त्रिशूळ घेऊन विमानात जाण्याची परवानगी दिली गेली हे खरं आहे. मात्र, या त्रिशूळाला अजिबात धार नव्हती. त्यामुळं कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही,’ असं सीआयएसएफचे बीएल जट्ट यांनी स्पष्ट केलं.
जेट एअरवेजने मात्र या वादापासून हात झटकले आहेत. ‘विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफची आहे. आमचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही,’ असं ‘जेट’नं म्हटलं आहे. तर, ‘जेट’च्या प्रवाशांनी सुरक्षा अधिकार्यांवर पक्षपाताचा आरोप केला आहे. ’सर्वसामान्य प्रवाशांना साधं नेलकटर घेऊन विमानात चढण्याची परवानगी दिली जात नाही. मग ‘राधे मॉं’ला त्रिशूळासह प्रवास करण्याची परवानगी देऊन आमचा जीव धोक्यात का टाकण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.