*** आ. संदीप नाईक यांची तातडीने घटनास्थळाला भेट
नवी मुंबई : सिडकोने विकसित केलेल्या इमारती आणि राहण्यासाठी धोकादायक असलेल्या इमारतींच्या छतांचे स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाशी येथील सिडकोच्या जी टाईम इमारतींमधील घरांचे छत कोसळण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आज (मंगळवारी) वाशी सेक्टर 29 येथील एका खाजगी इमारतीमधील रहिवासी संजय जाधव यांच्या घराच्या छताचा स्लॅब कोसळल्याने खाजगी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या दुर्घटनेची माहिती समजताच आ. संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. खाजगी धोकादायक इमारतींमधील छत कोसळण्याच्या दुर्घटना घडू लागल्याने या इमारतींचा पुनर्विकास तातडीने होणे गरजेचे आहे. त्याकरीता शासनाकडे मागणी केली आहे. सिडकोच्या धोकादायक इमारतींप्रमाणे खाजगी इमारतींनाही वाढीव एफएसआय मंजुर करावा या मागणी साठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाशी सेक्टर 29 येथील 22 वर्षे जुनी असलेल्या जयशंकर इमारतीमधील तिसर्या मजल्यावरील घरातील छत आज सकाळी अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेतून घरातील रहिवासी थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच आ. संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना आ. नाईक म्हणाले की, सिडको निर्मित धोकादायक इमारतींचा पुर्नविकास आणि वाढीव एफएसआयसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता आणि तो मंजुरही झाला आहे. परंतु, शासनाने जो वाढीव एफएसआय जाहीर केला आहे, त्यामध्येही त्रुटी आहेत.
खाजगी इमारतींचाही पुनर्विकास गरजेचा आहे. सिडकोच्या धोकादायक इमारतींना ज्याप्रकारे वाढीव एफएसआय शासनाने जाहीर केला आहे, त्याच धर्तीवर खाजगी इमारतींनाही वाढीव एफएसआयसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून लवकरच यासंदर्भात एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती आ. नाईक दिली.