संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : बेलापूर प्रभाग क्र. 101 मधील आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान असणार्या हार्बर रेल्वे मार्गावर आकाशमार्गिका अर्थात स्कायवाक उभारण्याची मागणी स्थानिक शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांसकडे केली आहे.
आयकर कॉलनी येथे वास्तव्य करणार्या नागरिकांना याठिकाणी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दैनंदिन बाजाराची व्यवस्था नसल्याने, येथील नागरिकांना दैनंदिन गृहपयोगी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी रेल्वेचा हार्बर मार्ग पायी ओलांडून बेलापूर गाव येथे जावे लागते. तसेच, आयकर कॉलनीमध्ये शासकीय अनुदानित विद्यालय नसल्याने या भागातील बहुतांश विद्यार्थी बेलापूर गाव येथील अनुदानित विद्यालयात जाणे हेतू आपला जिव मुठीत घेवून सदरचा रेल्वेमार्ग ओलांडतात. ज्यामध्ये, विद्यार्थी वर्तमान किंवा भविष्यात स्वत:च्या जिवाला मुकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे सर्व लक्षात घेता महानगरपालिकेच्या माध्यमातून तत्काळ आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान असणार्या हार्बर रेल्वे मार्गावर आकाशमार्गिका अर्थात स्कायवाक उभरण्यात यावे अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे. याप्रसंगी, शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील व प्रभागातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.