संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर पुनम मिथुन पाटील यांनी आरोग्य विभागातील अधिकार्यांची आढावा बैठक घेऊन पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने विभागामार्फत राबविण्यात येणार्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली, तसेच नेरुळ ,ऐरोली व बेलापूर येथील रुग्णालये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीत गतीमानता आणण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ रमेश निकम, डॉ. दयानंद कटके, सार्वजनिक रुग्णालय वाशीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, तसेच इतर वैद्यकीय अधिकारी, माता बाल रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी सभापतींनी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन पावसाळ्यात उद्भवू शकणार्या साथीच्या आजारांवर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या आरोग्य विभागास सूचना केल्या. तसेच स्वाइन फ्लू , मलेरिया, डेंग्यू या आजारांच्या वाढत्या समस्यांवर खंत व्यक्त करुन वैद्यकीय अधिकारी यांनी अधिक सजग राहून तातडीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत असे सूचित केले.
महानगरपालिकेमार्फत याविषयी ठिकठिकाणी हिवताप शिबिरे, घरांतर्गत पावडर फवारणी, डास उत्पत्तीस्थानके शोध मोहिम आदी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याबाबतची माहिती देत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांनी यापुढे अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल असे सांगितले. लवकरच पुन्हा एकवार आढावा घेण्याचे आरोग्य सभापती पुनम पाटील यांनी जाहीर केले.