** सिडकोचे माजी संचालक नगरसेवक नामदेव भगत यांची आक्रमक भूमिका
नवी मुंबई : मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील गाणी, मिमिक्री, नृत्य, संभाषणातून आगरी-कोळी संस्कृतीची प्रतिमा मलीन करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई, ठाणे, रायगड या भागात आगरी-कोळी समाज मोठ्या संख्येने निवासी वास्तव्य करून आहे. गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक ठिकाणी आगरी-कोळी भाषेतील संवाद, गाणी, चालीरिती याबाबत मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील गाणी, मिमिक्री, नृत्य तसेच संभाषणातून आगरी-कोळी समाजाची प्रतिमा मलीन करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हा समाज शिवीगाळ करणारा, मद्यप्राशन करणारा अशी प्रतिमा जाणिवपूर्वक अन्य समाजबांधवांपुढे निर्माण केली जात आहे. यामुळे आगरी-कोळी समाजाबाबत अन्य घटकांपुढे चुकीची प्रतिमा निर्माण होत असून या समाजाची बदनामी होत आहे. बिअरबारमध्ये असणारी नृत्ये, गाणी, सार्वजनिक ठिकाणी चालणारी मिमिक्री, विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम संभाषण, नृत्य पाहिल्यावर येथील आगरी-कोळी समाजाबाबतचे होणारी चित्रिकरण मनाला यातनादायी आहे. संयम व सहनशीलतेला या कोठेतरी मर्यादा असतातच. हे प्रकार कोठेतरी थांबले पाहिजे. आगरी-कोळी समाजातील 1% वर्ग चुकीचा वागत असेल तर उर्वरित 99 % आगरी-कोळी समाजाची बदनामी करण्याचा हक्क कोणालाही नाही. त्यामुळे वर्तमानात व नजीकच्या भविष्यात आगरी-कोळी समाजाबाबत चुकीचे व भयावह चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे होवू नये म्हणून प्रशासकीय स्तरावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुळातच आगरी-कोळी समाजामध्ये, या समाजाच्या चालीरितीमध्ये अधिकांश बाबी चांगल्या आहेत. ज्या अन्य समाजबांधवांमध्येही पहावयास मिळत नाही. आगरी-कोळी समाजातील अनेक चांगल्या गोष्टी ज्या प्रमाणात समाजामध्ये पुढे आल्या पाहिजेत, इतरांनाही समजल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने असे न घडता चुकीच्या पध्दतीने आगरी-कोळी संस्कृतीचे सादरीकरण केले जात आहे. आमच्या आगरी-कोळी समाजामध्ये विवाहामध्ये हुंडा घेतला जात नाही. हे आमच्यासाठी भूषणावह आहे. आगरी-कोळी समाजामध्ये घटस्फोट हा प्रकार पहावयास मिळत नाही. आगरी-कोळी समाजातील तब्बल 99 टक्केहून अधिक घटक तंबाखू, सिगारेट या व्यसनापासून अलिप्त आहेत. गेल्या एक दशकाहून अधिक काळात मी नवी मुंबईत आगरी-कोळी महोत्सवाच्या माध्यमातून शहरवासियांपुढे आगरी-कोळी समाजातील चांगल्या बाबींचे उदात्तीकरण करण्याचा प्रामाणिक प्रयास करत असल्याचे नामदेव भगत यांनी संबधितांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
ज्या वाहिन्यावर आगरी-कोळी संस्कृतीचे चुकीच्या पध्दतीने प्रसारण होत असेल त्या कार्यक्रमांवर तात्काळ बंदी आणून त्या वाहिनीलाही आर्थिक दंड ठोठावण्यात यावा. ज्या सार्वजनिक कार्यक्रमात मिमिक्रीच्या माध्यमातून आगरी-कोळी समाजाचे विडंबन करत असेल याबाबतचा प्रकार कोणी पुराव्यासह निदर्शनास आणून दिला तर त्यास कठोरात कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. ज्या बिअरबारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली आगरी-कोळी लोकनृत्याच्या आड अश्लिलतेला प्राधान्य दिले जात असेल त्या बारचा मनोरंजन परवाना बंद करून बारवरही बंदी आणण्याची तजवीज करण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.
मिमिक्री, नृत्य, संभाषणाच्या नावाखाली आगरी-कोळी समाजबांधवांचे, संस्कृतीचे चुकीच्या पध्दतीने प्रसारण करून जनसामान्यात आगरी-कोळी समाजाची प्रतिमा मलीन केली जात आहे. आगरी-कोळी समाज हा गरम डोक्याचा, गरम रक्ताचा म्हणून ठाणे, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात प्रसिध्द आहे. आगरी-कोळी संस्कृतीचे होत असलेले चुकीचे चित्रण यामुळे या समाजामध्ये उद्रेक वाढीस लागला आहे. नजीकच्या भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमातून आगरी-कोळी संस्कृतीचे, गाण्यांचे चुकीच्या पध्दतीने प्रसारण झाल्यास आगरी-कोळी समाज संबंधितांच्या पाठीवर टाळ्या वाजविण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा नामदेव भगत यांनी दिला आहे,.
या प्रकारामुळे आगरी-कोळी समाजामध्ये वाढीस लागलेला उद्रेक, भावनिक बाब आदी पाहता सार्वजनिक कार्यक्रमातून, नृत्यातून, मिमिक्रीतून अथवा बिअर बारमध्ये मनोरंजन नृत्यातून आगरी-कोळी समाज संस्कृतीची होत असलेली प्रतिमा मलीन करण्याची पध्दत थांबविण्याकरता शासनानेच आता पुढाकार घ्यावा आणि गृहखात्याला तसेच शासनाच्या सांस्कृतिक विभागाला त्याबाबतचे योग्य कारवाईचे आदेश देण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.
याबाबत ठाण्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे या विषयाबाबत लेखी तक्रार करणार असल्याची माहिती नामदेव भगत यांनी यावेळी दिली.