ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनेक धोकादायक इमारतीत पोस्ट ऑफिसेस आहेत. ती मोडळीस आलेली आहेत. त्यामुळे या इमारती तात्काळ खाली करा अन्यथा दुर्घटनेस पोस्ट खातेच जबाबदार राहील, अशा सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए. के. दास यांची भेट घेऊन दिला आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या 23 लाखांपर्यंत गेली आहे. 50 वर्षापूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारती आता धोकादायक झाल्याने या धोकादायक इमारतीना ठाणे महानगरपालिकेने नोटिसा बजावून खाली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या इमारतीचे मालक व भाडेकरू यांच्या वादामुळे या इमारतीची पुनर्बाधणी झाली नाही. त्यामुळे ठाण्यातील कोपरी येथील टपाल कार्यालयातील 25 कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. तसेच या टपाल कार्यालयात दररोज येणारे सुमारे 200 ते 250 ज्येष्ठ नागरिक व महिन्याच्या अखेरीस येणारे सोळाशे निवृती वेतनधारक जीव धोक्यात घालून पेन्शनसाठी येत असतात. पोस्टाची ही धोकादायक इमारत कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तत्काळ ते विभागीय पोस्ट ऑफिस दुसर्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तसे न केल्यास इमारत दुर्घटनेची पूर्ण जबाबदारी आपली असेल असे विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांना सांगितले. त्यावर त्यांनी या इमारतीची पाहणी करून पुढील 2 महिन्यांच्या कालावधीत उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर मीरा-भाईंदर शहरासाठी 3 मुख्य कार्यालये आहेत. भाईंदर पूर्व येथील टपाल कार्यालय धोकादायक झाल्याने हे टपाल कार्यालयही दुसरीकडे तत्काळ स्थलांतरित करावे. कर्मचार्यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या नसल्याने ते खाली जमिनीवर बसूनच काम करत आहेत. विनाविलंब, विनातक्रार सेवा देण्यासाठी कर्मचारी वर्ग वाढवणे गरजेचे आहे. असेही खासदार विचारे यांनी स्पष्ट केले. 3 हजार कर्मचारी भरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उठवली असल्याने ही भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल, असे दास यांनी सांगितले. महापालिकेने पोस्टसाठी आरक्षित केलेले भूखंड विकत घ्यावे. किंवा मूळ भूखंड मालकाकडून पोस्टाच्या नियमानुसार राखीव क्षेत्रावर बांधकाम करून घेऊन स्वत:च्या हक्काचे कार्यालय बांधून घ्यावे. तसेच भाडेतत्त्वावर सुरू असणारे कार्यालय बंद करावे. अशाही सूचना खासदार विचारे यांनी केल्या.