जकार्ता : भारताची फुलराणी आणि ऑलिंपिक विजेत्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत सायनाचा स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जकार्ता येथे रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मरिनने सायनाला 21-16, 21-19 असे पराभूत केले आणि विश्वविजेतेपद जिंकले. 59 मिनिटे हा सामना रंगला.
सायनाने या स्पर्धेत एकही पदक आतापर्यंत मिळवले नव्हते. यावेळी पदक मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या सायनाने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम स्पर्धेत मरिनकडून पराभव झाल्याने सायनाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
शनिवारी सायनाने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फनेत्रीवर विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यासोबतच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती पहिली खेळाडू ठरली होती.